जळगाव, (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर ओळख झालेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तरुणीला जळगावात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेरी (ता. जामनेर) येथील अमोल राठोड या तरुणाविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० जुलै रोजी घडली.
शिरपूर येथील पीडित तरुणी आणि संशयित अमोल राठोड यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर, त्यांचे फोनवर नियमित बोलणे सुरू होते. याच ओळखीतून १० जुलै रोजी अमोलने तरुणीला जळगाव बस स्थानकावर भेटण्यासाठी बोलावले. आईला शाळेत जात असल्याचे सांगून तरुणी जळगावात आली होती.
अमोल मित्राला सोबत घेऊन तिला भेटायला आला. सुरुवातीला तो तिला मित्राच्या घरी घेऊन गेला, मात्र मित्र व त्याची पत्नी बाहेर गेल्यावर त्याने तरुणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केल्यामुळे, रात्री साडेआठच्या सुमारास तो तिला एका भाड्याच्या खोलीवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्याने तिला पुन्हा मित्राच्या घरी सोडून तो निघून गेला.
पीडित तरुणीने आपल्या मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. तिच्या नातेवाईकांनी जळगावात येऊन तिला शिरपूर येथे घेऊन गेले. अखेर पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांनी अमोल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी करत आहेत.










