पाचोरा, (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात काल (शुक्रवारी) सायंकाळी बस स्थानक परिसरात आकाश कैलास मोरे (वय २६) या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी निलेश अनिल सोनवणे (वय २७) आणि प्रथमेश सुनील लांडगे (वय १९) या दोन संशयितांनी स्वतःहून जामनेर पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी आकाश मोरे बस स्थानक परिसरात आला असता, निलेश आणि प्रथमेश यांनी गावठी कट्ट्यातून त्याच्यावर आठ ते दहा राऊंड गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आकाशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमागे दुचाकीच्या वादातून झालेला संघर्ष असल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयितांच्या आई-वडिलांनाही ताब्यात घेतले आहे. निलेश व प्रथमेश यांच्याकडून दुचाकी दोन पिस्तूल आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. मयत आकाश मोरे अविवाहित होता आणि गेल्याच महिन्यात त्याच्या आईचे निधन झाले होते. तो सेंट्रिंगचे काम करत होता.
या घटनेला एक वेगळे वळण देणारी बाब म्हणजे, आकाशने दोन दिवसांपूर्वी एक रील (Reel) तयार करून समाज माध्यमांवर पोस्ट केली होती. या रीलमध्ये त्याने “दोन दिवसांत ३०२ चा गुन्हा घडणार” असल्याचे म्हटले होते. या रीलच्या दोन दिवसांनंतरच त्याच्यावर गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या रील आणि हत्या प्रकरणातील संबंधांचा तपास करत आहेत.