चाळीसगाव, (प्रतिनिधी) : दिल्ली येथे दाखल ४९ लाख रूपयांच्या ऑनलाइन घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्यात दिल्ली पोलिसांनी गुरूवारी चाळीसगावातून दोघांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकाची चौकशी करून पुढील तारखेला हजर राहण्याची नोटीस बजावत सोडून दिले तर दुसऱ्याला अटक केली आहे. त्याला घेऊन दिल्ली पोलिस रवाना झाले आहे.
दिल्लीतील ४९ लाखांचा डिजीटल ऑनलाईन फसवणुक प्रकरणात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत चाळीसगाव येथील कपील पाटील व पुष्कर चंद्रकांत पाखले यांची नावे समोर आली. त्यामुळे चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी चाळीसगाव गाठले. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप घुले, हवालदार योगेश बेलदार, नितीन अगोणे, निलेश पाटील, अजय पाटील यांनी दिल्ली पोलिसांना मदत केली.
फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी कपील पाटील व पुष्कार पाखले या दोघांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. चौकशीत मुख्य सूत्रधार हा पुष्कर पाखले असल्याची माहिती कपील पाटील याने दिली. त्यानुसार पुष्करला अटक केली तर कपीलला यास तपासाकामी दिल्ली पोलिसात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये दाखल गुन्ह्यात चाळीसगावच्या तरुणाचे नाव आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.