चोपडा, (प्रतिनिधी) : अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर राज्य महामार्गावर सुरत-बऱ्हाणपूर बस अडावदहून यावलकडे जातांना मोहन नाल्याजवळ प्रवासी बस कंटेनरला धडकल्याने ९ जण जखमी झाले. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेश परिवहन मंडळाची (एम.पी. ६८ पी. २७०) हि प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुरत-बुऱ्हाणपूर बसने दि.१५ रोजी दुपारी ४ वाजता अडावद पंचक दरम्यान लोणी शिवारातील मोहन नाल्याच्या पुलाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराला वाचवितांना पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात बस मधील ९ प्रवासी जखमी झाले. त्यात नबाब रुबाब खाटीक (वय ५०, यावल), गोकुळ प्रताप पाटील (वय ३८, चोपडा), निर्मला एकनाथ चौधरी (वय ४५, धानोरा), उज्वला निलेश पाटील (वय ३८, धानोरा), भावेश शरद भामरे (वय १२, रा. मेहरगाव), राजाराम भागा चव्हाण (वय ६५, धुळे), आशा प्रदीप भामरे (वय ३५,मेहरगाव), रामचंद्र बळीराम सोनवणे (वय ५०, हिंगोणा), मंगला शंकर डोळे (वय ५०, धुळे) हे जखमी झाले.
यावेळी लोणी पोलीस पाटील नरेंद्र पाटील यांनी १०८ नंबरची रुग्णवाहिका बोलवून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेत बसविले. त्यांचेवर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी रुग्णांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवानगी करण्यात आले. घटनास्थळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार सुनिल तायडे, फिरोज तडवी, अनिल पिसाळ, शेषराव तोरे शुभम बाविस्कर यांनी धाव घेत दोन्ही बाजुंनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.