गांधीनगर, (जिमाका) : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते ऑस्ट्रेलिया–भारत क्रीडा उत्कृष्टता मंच (Australia-India Sports Excellence) चे उद्घाटन करण्यात आले. गुजरातमधील GIFT सिटी येथे झालेल्या या कार्यक्रमाद्वारे दोन्ही देशांमधील क्रीडा सहकार्य बळकट करण्यावर भर देण्यात आला.
हा मंच क्रीडा क्षेत्रातील गुणवान खेळाडूंचा शोध आणि विकास, स्पर्धा आयोजन, शिक्षण व क्रीडा विज्ञानाचा वापर, तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना देणे यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की, क्रिकेट आणि हॉकीसह इतर खेळांमध्येही खासगी क्षेत्राची गुंतवणूक वाढवण्यास प्राधान्य दिले जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा सहकार्य क्रीडा उद्योग, विज्ञान आणि धोरणात्मक भागीदारीद्वारे आणखी मजबूत होईल. त्यांनी यावेळी TOPS (Target Olympic Podium Scheme), फिट इंडिया, ASMITA यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत क्रीडा महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे सांगितले.
भविष्यातील योजना आणि सहकार्य..
२०३६ ऑलंपिक आणि पॅरालंपिक यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सहकार्य आणि अनुभवांची देवाणघेवाण होणार. क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने खेळाडूंची क्षमता वाढवण्यावर भर. क्रीडा उद्योगात खासगी गुंतवणुकीला चालना. क्रीडा धोरणांच्या विकासासाठी द्विपक्षीय भागीदारी बळकट करणे.
गुजरात – भारताच्या क्रीडा संरचनेचा नवा केंद्रबिंदू..
राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी गुजरात राज्याच्या क्रीडा पायाभूत सुविधांच्या वाढत्या विकासाचा उल्लेख करत, यामुळे भारताच्या क्रीडा महासत्तेच्या दिशेने प्रवासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या समारंभाला ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन, गुजरातचे क्रीडा व सांस्कृतिक मंत्री हर्ष संघवी, तसेच ऑस्ट्रेलियन क्रीडा आणि उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
ऑस्ट्रेलिया–भारत क्रीडा उत्कृष्टता मंच हा भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या वाढीसाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया हा भारताचा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार ठरणार असून, दोन्ही देशातील सहकार्याने जागतिक स्तरावर भारताच्या क्रीडा क्षेत्राला नवीन उंची मिळेल.