जळगाव, (प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत आरोपींना अटक केली आहे. तब्बल ५१ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर व तांत्रिक विश्लेषण केल्यावर दोघं संशयित आरोपीना गजाआड करण्यात आले आहे. तर आणखी एका चोरीप्रकरणी विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सुरेश हिराराम सोलंकी (रा. सावीत्रीनगर, जळगाव) हे लग्नसमारंभासाठी राजस्थानला गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घरातील १ लाख ६० हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू व ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हे शोध पथकाने ५१ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित आरोपी म्हणून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याचे नाव समोर आले. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर तो श्री ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला एका लॉजमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार दिपक राजू पाटील (वय २३, रा. तांबापुर, जळगाव) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी मुक्ताईनगर येथे जाऊन दिपक पाटीललाही अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या १ लाख १५ रुपयांच्या चांदीच्या वस्तू, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. दुसऱ्या प्रकरणात, गणेशपुरी मेहरुण, जळगाव येथे राहणारे मोहसीन खान अजमल खान यांच्या घरातून २३ हजार ३०० रुपये चोरीला गेले होते. पोलीस कर्मचारी रतन गीते, राहुल घेटे, नितीन ठाकूर यांनी तपास करत मास्टर कॉलनीतील एका विधीसंघर्ष बालकाचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गौरव पाटील, मिलिंद जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तपासात मोलाची भूमिका बजावली.