जळगाव, (प्रतिनिधी) : नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेले दाम्पत्य दुचाकीवरून घरी येत असतांना एमआयडीसीतील रेमंड चौफुलीवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय पुंडलिक नारखेडे (५५, मूळ रा. ममुराबाद, ह.मु. एमआयडीसी परिसर) हे मयत झाले असून त्यांची पत्नी ज्योत्सना नारखेडे (वय ४१) हे गंभीर जखमी झाले आहे. तालुक्यातील ममुराबाद येथील रहिवाशी असलेले संजय नारखेडे हे पत्नी ज्योत्स्ना यांच्या सोबत एमआयडीसी परिसरात वास्तव्याला होते. ते एका कंपनीत कामाला होते. सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता ते लग्न सोहळ्यावरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीझेड ८१८९) ने परतत असताना रेमंड चौकात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या घटनेनंतर दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी संजय नारखेडे यांना मयत घोषित केले, तर त्यांची पत्नी ज्योत्स्ना यांच्या डोक्याला, पायाला जबर दुखापत होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.