जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील अशोक नगर येथे २ गटात जुन्या वादातून दोन गट भिडले यात प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एका तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार झाल्यामुळे त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तर इतर ५ जणांवर उपचार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम रात्री सुरू होते.
शिरसोली येथे दोन दिवसांपूर्वी उत्सव मिरवणुकीमध्ये दोन गटात वाद झाले होते. त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. यानंतर बुधवारी दि. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता याच वादातून पुन्हा दोन्ही गटामध्ये वाद झाले. अशोक नगरात अंगणात बसलेल्या राजाराम शिवराम पाटील (वय ५०) यांना एका गटाकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. (केपी)एकाने त्यांच्या पाठीत व हातावर हातोडे मारले. त्यांना वाचवण्यासाठी भूषण बाळू पाटील (वय १८), आणि अजय जयराम पाटील (वय २६) हे मध्ये पडले.
तेव्हा टोळक्याने अजय पाटील यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला तर चेहऱ्यावर देखील धारदार शस्त्राने वार केले आहेत. भूषण पाटील यांच्या उजव्या डोळ्याजवळ लोखंडी रॉड मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर दुसऱ्या गटातील सुभाष महादु भील (वय ५०), सचिन आत्माराम भील (वय २३), गीताबाई महादू भील (वय ८६) हे जखमी झाले आहेत.
जखमींना ग्रामस्थांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची माहिती जाणून घेतली. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.