जळगाव, (प्रतिनिधी) : येथील ग.स. सोसायटीत घडलेल्या नाट्यमय घडामोडीत अध्यक्षपदी अजबसिंग पाटील बिनविरोध निवडून आले तर उपाध्यक्षपदी ए.टी.पवार यांना १३ मते तर सहकार गटाचे मंगेश भोईटे यांना ८ मते मिळाली.
ग. स. सोसायटीत मागील अडीच वर्षापासून उदय पाटील अध्यक्ष होते तर उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे होते. या दोघांनी मागील महिन्यात राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेवर निवडणुकीचा कार्यक्रम दि. १४ रोजी घोषित करण्यात आलेला होता. त्यातच सहकार गटांमध्ये उभी फूट पडून ६ निष्ठावंत संचालकांचा गट वेगळा बाहेर पडला होता आणि त्यांच्या सोबतीला प्रगती गटाचे ५ आणि लोकसहकार गटातील २ असे १३ संचालक सहलीला गेले होते. तिन्ही गटाचे सर्व निष्ठावंत संचालक आज जळगाव येथे दाखल झाले. सोमवारी सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.
अध्यक्षपदासाठी अजब पाटील तर उपाध्यक्ष पदासाठी ए टी पवार यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातच सहकार गटाकडून उपाध्यक्ष पदासाठी मंगेश भोईटे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. तिन्ही गटांनी अध्यक्षपदासाठी उमेदवार असलेले अजबसिंग पाटील यांना पाठिंबा देऊन बिनविरोध निवडून आणले. तर उपाध्यक्ष पदासाठी ए.टी पवार व मंगेश भोईटे यांच्यात लढत झाली. यात ए.टी. पवार यांना १३ मते तर भोईटे यांना ८ मते मिळाली. यात ए.टी. पवार यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले.