जळगाव, (जिमाका) – रानभाज्यांना आयुर्वेदात अन्यनसाधारण महत्व असून त्या पौष्टीक व जीवनसत्वयुक्त असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी या रानभाज्या महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे रानभाजी महोत्सव एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता पावसाळा कालावधीत महिन्यातून किमान एक-दोनवेळा या महोत्सवाचे आयोजन करावे. अशी सुचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सावचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री सुनील महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, रोटरीचे प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, अध्यक्ष कृष्णकुमार वाणी आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी रानभाजी महोत्सव आयोजनामागील संकल्पना सांगून रानभाज्यांचे महत्व विशद केले. तसेच 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर रोटरीयन योगेश भोळे यांनी रोटरी क्लबने गेल्या काळात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच चांगल्या कामासाठी रोटरी क्लब नेहमीच मदतीसाठी पुढे असेल असेही सांगितले.
यावेळी कृषि विभागाने तयार केलेल्या रानभाजी ई-पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील यांच्या हस्ते कळ दाबून केले. यावेळी आहारतज्ज्ञ डॉ अनंत पाटील यांनी आहारात रानभाज्यांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. मनोजकुमार चोपडा यांनी रानभाज्यांचे औषधी उपयोग यावर सादरीकरणासह मार्गदर्शन केले.
या महोत्सवात जिल्हाभरातून 66 पेक्षा अधिक शेतकरी सहभागी होऊन त्यांनी 26 पेक्षा अधिक विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. याठिकाणी रानभाज्या खरेदी करण्यासाठी जळगावकर नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. यावेळी रानभाज्यांची जनजागृती करणाऱ्या निवडक शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, कुर्बान तडवी, दीपक ठाकूर, रोटरीचे मानद सचिव अनुप असावा व इतर पदाधिकारी, कृषि विभाग, आत्माचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय पवार यांनी तर उपस्थितांचे आभार आत्माचे प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी यांनी केले.