जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सभा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांचे उपस्थितीत झाली. सभेत आ. एकनाथराव खडसे यांनी स्वपक्षातच माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांना उद्देशून चिमटे काढण्याचे काम केले. राष्ट्रवादीत मी नवखा, सतीश अण्णा तर सिनियर लीडर…सभेत येण्यासाठी त्यांची परवानगी घेतली…अशा विविध शब्दात त्यांनी शालजोडीत मारण्याचे काम केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा जामनेर येथे शनिवारी उत्साहात पार पडला. यावेळी जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी व्यासपीठावर होती. प्रसंगी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचे भाषण चर्चेचे ठरले. यावेळी पक्षातील जेष्ठ नेते व माजी मंत्री सतीश पाटील यांची आ. खडसे यांनी जाहीर व्यासपीठावरच विकेट घेतली. यावेळी आ. खडसे म्हणाले की, सभेत बोलण्याआधी मी सतीश अण्णाची परवानगी घेतली. यावेळी सतीश अण्णांना हसू आवरेना झाले. खडसे म्हणाले की, अण्णाला म्हटले सभेला येऊ कि नको येऊ ? नंतर व्यासपीठावर आल्यावर म्हटले, भाषण करू कि नको करू ? कारण राष्ट्रवादीमध्ये मी नवखा आहे.
ते फार सिनियर लीडर आहेत आणि सिनियर लीडरच्या परवानगीशिवाय बोलणे म्हणजे.. इथे श्रीराम दयाराम पाटील आहे. सतीश अण्णा म्हणाले होते की, श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजॆ. तरच पार्टीत आले पाहिजे. चाळीसगावला जयंतरावांना विचारले, मी येऊ कि नको ? कारण मी पार्टीत आहे कि नाही ? अशा शेलकी शब्दात आ. खडसे यांनी सतीश अण्णा यांचा समाचार घेतला. यावेळी सतीश अण्णांना शेवटी चेहऱ्यावरचा घाम पुसावा लागला. प्रसंगी, मी राष्ट्रवादीतच होतो असेही खडसे म्हणाले. मग, खडसेंनी लोकसभेवेळी भाजप उमेदवाराचा प्रचार करून राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना का अडचणीत आणले ? असा सवाल राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी विचारला आहे.