जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा दि. ५ डिसेंबर तसेच विद्यापीठ कॅम्पसवरील स्पर्धा ७ डिसेंबर रोजी तर विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा दि. १९ ते २० डिसेंबर, २०२४ या कालावधीत होणार आहे.
कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली अविष्कार स्पर्धा संयोजन समितीची बैठक बुधवार दि. ११ सप्टेंबर रोजी झाली. त्या बैठकीत स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. ५ डिसेंबर रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा संशोधन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संबंधित जिल्हयातील महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. दि. ७ डिसेंबर रोजी विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी संशोधन स्पर्धा विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे. या जिल्हास्तरीय महोत्सवातील विजेत्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धा १९ व २० डिसेंबर, २०२४ रोजी विद्यापीठात होणार आहे. या बैठकीस प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्राचार्य एस.एस. राजपूत, प्रा. एस.टी. भुकन, प्रा.जगदीश पाटील, अविष्कार स्पर्धेचे समन्वयक प्रा.एच.एल. तिडके, उपसमन्वयक प्रा. नवीन दंदी तसेच प्रा. सचिन नांद्रे, डॉ. दिनेश पाटील, प्रा. जे.एस. साळी, प्रा.विशाल पराते, डॉ. सारंग खाचणे आदी उपस्थित होते.