नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- मंगळ ग्रहावरील विविध छायाचित्रेही समोर येताना दिसतात. सॅटलाईट फोटो पाहून आपणही भारावून जातो. सध्या असाच एक फोटो समोर आला आहे. हा अद्भूत फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. आपण जेव्हा शांतपणे एका शांत समुद्रकिनाऱ्यावर बसलेलो असतो तेव्हा आकाशात दिसणाऱ्या ढंगांमध्येही आपल्याला विविध आकार दिसतात. सध्या समोर आलेल्या फोटोत तुम्ही पाहू शकता की, अवकाशातून मंगळ ग्रहाच्या जमिनीवर एक अनोखा आकार दिसला आहे. हा फोटो सध्या सर्वत्र चांगलाच व्हायरल होतो आहे.
तुम्ही या फोटोत पाहू शकता की, चक्क एका मानवाचा हसरा चेहरा दिसण्याचा भास व्हावा तसा चेहरा या फोटोतून दिसतो आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर शास्त्रज्ञांना असे चित्रविचित्र आकार तयार झालेले दिसतात. सध्या हा आकार पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत. नक्की हा आकार कसला आहे? मागील कारण काय आहे? असा प्रश्नही पडल्यावाचून राहत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून मंगळ ग्रहावर संशोधन सुरू आहे त्यातूनही या ग्रहावर जीवसृष्टी होती का? याचा तपासही शास्त्रज्ञांकडून घेतला जातो आहे. परंतु अद्याप याचे ठोस पुरावे सापडले नसून मंगळ ग्रहावर पाणी असल्याची दाट शक्यता समोर आली आहे.युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरमधून हा फोटो टिपला आहे. संस्थेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकांऊटवरून तो शेअर केला आहे. जमिनीचा हा भाग मिठागराने व्यापला आहे, असे कळते. कोट्यवधी वर्षांपूर्वी मंगळावर नद्या, समुद्र, तलाव असण्याची दाट शक्यता आहे. त्यातून शास्त्रज्ञांना असे वाटते की, या सापडलेल्या मिठागरच्या साठ्यातून कदाचित मंगळावरील जीवसृष्टीचाही उलगडा होईल.
मंगळ ग्रहावर कधीकाळी जीवसृष्टी होती का? या प्रश्नाला दुजोरा देणारे अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यातून मंगळ ग्रहावर माणसासाठी राहण्याजोगे योग्य वातावरण आहे का?, याचाही संशोधक तपास करत आहेत. पुढील काही वर्षात मानव हा मंगळ ग्रहावर आपले जीवन सुरू करेल असेही कळते आहे.