जळगाव, अमळनेर, चोपडा येथे झाल्या घरफोड्या
जळगाव (प्रतिनिधी ) : जळगाव जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे घरफोडीच्या घटना उघडकीस येत असून जिल्ह्यातील जळगाव शहर , अमळनेर, चोपडा आदी ठिकाणांहून बंद घरांना टार्गेट करून घरातील रोकडसह सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्या- त्या पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेरात बंद घराचे कुलूप तोडून 69 हजार रुपयांचा ऐवज लंपास
अमळनेर शहरातील प्रताप मिल कंपाऊंड मधील परिसरातील बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील प्रताप मिल कंपाऊंड परिसरात राहणारे विजय ब्रिजलाल पाटील (वय ३९) हे नोकरी व्यवसाय करीत असून ८ ते ९ सप्टेंबर च्या सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील २४००० किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला . याप्रकरणी विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडक्वार्टेबल नाना पवार करीत आहे.
चोपड्यात घरफोडी ; ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला
चोपडा शहरातील पुंडलिकनगर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. यात ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सुखलाल परदेशी हे खाजगी नोकरी करीत असून ते पुंडलिक नगर येथे राहतात. सात सप्टेंबर रोजीच्या रात्री साडेअकरा ते आठ सप्टेंबर रोजीच्या सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचा दरवाजाचा कडीकोंडा उचकटून खोलीत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉवर मधील ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६९,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे करीत आहे.
जळगावात चोरट्यांचा डल्ला ; ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल लांबविला
शिक्षक असलेले मयूर देशमुख ( वय ३६, रा.गौरी प्राईड अपार्टमेंट, भोईटेनगर) हे पत्नी व दोन मुलांसोबत भोईटेनगरात वास्तव्यास आहेत. ते बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून घरातून १ लाख ४० हजार रुपये किंमतेचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, ७० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगळ्या, ७० हजार रुपये रोख रक्कम, १४ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा, तर काही चांदीचे दागिणे मिळून ३ लाख २० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. या प्रकरणी मयूर देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामचंद्र शिखरे हे करत आहेत.
दरम्यान शहरातील दूध फेडरेशन परिसरात महावीर नगर भागातही घरफोडीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून चोर्त्यांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.