पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल
जळगाव, (प्रतिनिधी) : पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने कंपनीत शिरुन कामगारांसह कंपनीच्या मालकाला मारहाण केली. तसेच शस्त्राने त्यांच्यावर वार केले. तर दुसऱ्या गटाने देखील टोळक्याला मारहाण करीत जखमी केले. ही घटना नुकतीच एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील शक्ती प्लॅस्टीक इंडस्ट्रीजमध्ये घडली होती. याप्रकणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसीतील व्ही सेक्टरमध्ये शक्ती प्लॅस्टीक इंडस्ट्रीज नावाने कंपनी आहे. त्याठिकाणी साहिल आयुब पठाण (वय २५, रा. चांदसर, ता. धरणगाव. ह. मु. समता नगर) हा तरुण कंपनीत मजूर म्हणून काम करतो. दि. ६ रोजी तो ड्युटीवर असतांना अनिल विश्वकर्मा, राजू तुळशीराम विश्वकर्मा यांच्यासह चार ते पाच जण त्याठिकाणी आले. त्यांनी पठाण याला तुम्ही येथे ड्युटी कशी काय करता, ही कंपनी माझी आहे. असे म्हणत त्यांच्या हातातील लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने पठाण यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीत कमलेश विश्वकर्मा यांच्यासह पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने प्रवेश करीत त्यांच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने कामगारांवर हल्ला केला. या भांडणात राजीव तुलशीदास विश्वकर्मा यांच्या गळ्यातील चैन व कामगार मंगला भोंडे यांच्या गळ्यातील पोत कुठेतरी गहाळ झाली. याप्रकरणी राजीव विश्वकर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कमलेश विश्वकर्मा यांच्यासह पंधरा ते वीस जणांविरुद्ध परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ विजय पाटील हे करीत आहे.