जळगाव, दि.१४ प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभाग आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहकार्य लाभले आहे.
याप्रसंगी एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे साठा अधिक्षक (स्टोरेज सुपरिटेंडन्ड) महेश ढाके, साठवणूक विभागाच्या सहाय्यक अधिक्षक अर्चना मेढे, एल. एम. पवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मदन लाठी, सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जैव विविधत जपता यावी यासाठी वृक्षारोपणासह संवर्धनाची मोहिम हाती घेतली आहे.
या सृजनशील उपक्रमात जळगाव हरित करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. राज्य वखार महामंडळ येथे झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी प्रास्ताविकात मदन लाठी यांनी उपक्रमाविषयी सांगितले. सुधीर पाटील यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. अर्चना मेढे यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशतर्फे मागील वर्षी लावण्यात आलेल्या झाडांपैकी ७० टक्के झाडे जोपासली असून ती सावली देत आहे. आज लावलेली झाडांची निगा सर्वांच्या सहकार्यातून राखणार असल्याची हमीसुद्धा त्यांनी दिली.
एफसीआयचे विभागीय व्यवस्थापक जगजितसिंग मारतोनिया यांनी झाड हे ऑक्सीजन देऊन मनुष्याला जगविण्याचे कार्य करते, त्यामुळे आज वृक्ष जगवले तरच आपण जगू शकू असे सांगत, वृक्षारोपण करुन ते जगविण्याचे आवाहन केले तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम खूपच कौतूकास्पद आहे यात सहभागी होता आल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे उमेश सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, वखार महामंडळाच्या शोभा सोनवणे यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले.