जळगाव (प्रतिनिधी) : महसूल प्रशासनात विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे वारे प्रशासनात सुरू आहे. जिल्ह्यात तलाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रशासकिय तसेच विनंती बदल्यांचे आदेश मंगळवार १३ रोजी काढण्यात आले. यात प्रशासकिय २३९ तर २४ विनंती बदली आदेशाचा समावेश असल्याचे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी सांगीतले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या समितीतील सदस्यांकडून या बदल्यांचे निर्णय घेण्यात आले आहेत. बदलीपात्र २६३ कर्मचाऱ्यांची यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात प्रशासकीय बदलीपात्र २३९ तर विनंती पात्र २४ जणांचा समावेश आहे. त्यानुसार मंगळवारी रिक्त जागांची स्थिती स्पष्ट करून पसंती क्रम विचारात घेत प्रत्यक्ष समुपदेशन करण्यात आले. त्यानुसार पसंतीच्या नियुक्तीचे पद रिक्ततेनुसार संबंधीत कर्मचाऱ्यांना लागलीच नियुक्ती देण्यात आली आहे.
बदली प्रक्रियेत सर्वाधिक तलाठी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात १५२ तलाठी वर्गातील प्रशासकीय तर ७ जणांच्या विनंतीपत्रानुसार बदल्या आहेत. तसेच दोन वाहनचालक बदलीपात्र आहेत. प्रशासकीय बदलीत मंडळाधिकारी ४. वाहनचालक २, अव्वल कारकून २५, तलाठी १५२, महसूल सहायक ५६, तर विनंती बदली प्रक्रियेत मंडळाधिकारी ७, अव्वल कारकून ५, तलाठी ४, महसूल सहायक ८ असे २६३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली.