जळगावच्या सह. कामगार आयुक्त कार्यालयातील प्रकार
जळगाव | दि. ०८ ऑगस्ट २०२४ | येथील सहकामगार आयुक्त कार्यालयात एका कामगार निरीक्षकाने मुकादम पदावरून दिलेली स्थगिती हटविण्यासाठी व त्याबाबतचा सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे असलेल्या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्याकरिता तक्रारदाराकडे ५० हजाराची मागणी केली होती. त्यापैकी तडजोडीअंती ३६ हजार रुपये स्वीकारताना या निरीक्षकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
चंद्रकांत पंडितराव पाटील (वय ५७, रा. वाघ नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या कामगार निरीक्षकांचे नाव आहे. जळगावातील ५१ वर्षीय तक्रारदार हे माथाडी कामगार संघटनाचे उपाध्यक्ष व मुकादम असून तक्रारदार यांचे मित्र हे पण मुकदम होते. त्यांना मुकदम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. त्याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी चालू होती. सुनावणीचा निकाल लावण्यासाठी मी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल लावून देतो मला ५० हजार रुपये द्यावे लागतील. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे दि. ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता चंद्रकांत पाटील यांनी पंचासमक्ष तडजोडअंती ३६ हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदर कारवाई हि पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव,पीएसआय दिनेशसिंग पाटील,पो.हे.कॉ. सुरेश पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रदीप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.