जळगाव | दि. ०८ ऑगस्ट २०२४ | येथील उच्चभ्रू वस्तीतील १६ वर्षीय मुलीचा झोपेतच उलटी झाल्याने तिचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिज्ञासा नरेंद्र निकुंभ (वय १६, रा.गणपती नगर, जळगाव) असे मयत मुलीचे नाव आहे. वडिल नरेंद्र निकुंभ हे शहरातील जीएसटी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिज्ञासा ही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता जिज्ञासाचे क्लास असायचे. त्यासाठी पहाटे ५ वाजता जिज्ञासाची आई तिला उठविण्यासाठी गेली असता, तिचे शरीर पूर्णपणे थंड पडलेले आढळून आले. लागलीच जिज्ञासाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री झोपेत तिच्या घशात उलटी अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. जिज्ञासा अतिशय हुशार व मेहनती असल्याने, तिच्या अचानक मृत्यूमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या पश्चात आई, वडिल व लहान बहिण असा परिवार आहे. जिज्ञासाच्या नातेवाईकांनी दिलेल्या महितीनुसार रात्री १२ वाजेपर्यंत तिने अभ्यास केला होता. त्यानंतर ती झोपली, दरम्यान, तिला याआधी कोणताही आरोग्यासंबधी त्रास नसल्याचीही माहिती नातेवाईकांनी दिली. तर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आला होता.