जळगाव, प्रतिनिधी : शहरातील रथ चौकात कमरेला गावठी पिस्तुल लावून दहशत माजविणाऱ्या परमेश्वर गजानन बांबर्डे (रा. गोपाळपुरा, जुने जळगाव) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रथ चौकात एक व्यक्ती कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवत असल्याची माहिती १८ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी पोलीस पथकाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले.

सहायक पोलीस निरीक्षक सुनील कदम, परिविक्षाधीन उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, युवराज कोळी, अजय निकम, नवजीत चौधरी, सतीश भारुळे आणि निलेश घुगे यांच्या पथकाने रथ चौकात धाव घेतली. परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या परमेश्वर बांबर्डे याला पथकाने ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल आढळून आले. पोलिसांनी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.









