रामानंद नगर पोलिसांची कारवाई
जळगाव | दि. २८ जुलै २०२४ | वायरी विविध ठिकाणांहून चोरून त्या वितळवून तांब्याचा गोळा करून विकणारी टोळीला रामानंद नगर पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून मुद्देमालासह रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
महाबळ परिसरात बांधकामाच्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचे वायरचे बंडल चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास सुरू असताना हे वायर सलीम शेख कय्युम (२७), फकिरा शेख रमजान (४०) दोघे रा. तांबापुरा, ईस्ताक अली राजीक अली (२०), आवेश शेख रफीक (१८) दोघे रा. पिंप्राळा हुडको यांनी चोरल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली.
ते शिरसोली रस्त्यावर एका रिक्षामधून जात असल्याचे समजताच त्यांना तपासाधिकारी सुशील चौधरी, सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, जितेंद्र राठोड, जितेंद्र राजपूत, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार यांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेले वायर वितळून त्याचा तांब्याचा गोळा केल्याची माहिती दिली. त्यानुसार हा १२ किलो वजनाचा तांब्याचा गोळा व रिक्षा जप्त करण्यात आली आहे. चारही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.