जळगाव, दि. 15 – जगाच्या इतिहासात अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत, त्या घटनांचा परिणाम जगातील अर्थकारणावर होत असतो. आणि भारत याला अपवाद नाही. भारत आत्मनिर्भर झाल्यास आगामी काळात महाशक्ती होऊ शकतो असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, लेखक व अभिनेता दीपक करंजीकर यांनी अनुभूती आतंरराष्ट्रीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन सुसंवाद साधतांना केले.
जागतिक स्तरावरील घटनांचा वेध घेणारे ‘घातसुत्र’ पुस्तकामुळे दीपक करंजीकर यांची मराठी साहित्य व अर्थ क्षेत्रात स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी 9/11 च्या निमित्ताने अमेरिकेतील स्थिती व त्याचा जगावर झालेला परिणाम यांचा वेध ओघवत्या वक्तृत्व शैलीत घेतला. 11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटवरील हल्ला व त्यामागील घटनांचे वास्तव, अभ्यासात्मक विश्लेषण विद्यार्थ्यांसमोर मांडले. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्याना शोधक व अभ्यासक बनण्याच्या दृष्टीने फक्त प्रयत्नच नव्हे तर कृती करावी असे आवाहन केले. सध्याची जगापुढे असलेली कोरोना महामारीची आव्हानात्मक स्थिती, चीन, टायटॅनिक अशा जगप्रसिद्ध घटनांवर त्यांनी प्रकाश टाकला. जगातील प्रमुख घटनांची सांगड भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडतांना अनेक उदाहरणातून वास्तव समोर ठेवत घटनांचे सुत्रधार हे कायमच नामानिराळे असतात असे स्पष्ट केले.
याप्रसंगी प्राचार्य मनोज परमार व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद हुसेन दाऊद आबिदी यांनी केले. विद्यार्थ्यांनी दीपक करंजीकर यांच्याकडून आपल्या शंकांचे समाधान देखील करून घेतले. औचित्याच्या व जागतिक इतिसाहात नोंद असलेल्या 9/11च्या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली अशी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनुभूती स्कूलच्या माध्यमातून यापुढेही विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.