जळगाव, दि.१४ – लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, रावेर, जळगाव आणि दिंडोरी येथे महिला उमेदवार घोषित झाले असून ही उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी दिली.
तसेच उत्तर महाराष्ट्रातील एकूण पाच लोकसभा मतदार संघा पैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये महिलांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने आणि नेतृत्वाने महिलांचा गौरव केला आहे अशी भावना जनसामान्यात प्रतिबिंबित झाली असून पक्षाच्या निर्णयाबद्दल डॉ. केतकीताई यांनी आभार व्यक्त केले.
त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या महिला उमेदवार पंकजा मुंडे-पालवे, डॉ.भारती पवार, डॉ.हिना गावित, स्मिता वाघ, रक्षा खडसे या सर्वांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा डॉ. केतकी पाटील यांनी दिल्या आहेत.