जळगाव, दि.११ – चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे गावठी कट्टयांचा सौदा करत असताना चार जणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून रंगेहात अटक केली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच पोलिस पथकाचे कौतुक केले.
दरम्यान पारउमर्टी येथील दोन जण अवैध अग्नीशस्त्राची विक्री करणार असुन सदरचा सौदा हा कृष्णापुर ता. चोपडा शिवारात उमर्टी रोडवरील घाटात होणार असल्याची गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे कृष्णापुर ते उमर्टी जाणारा डोंगराळ भागातील कच्चा रस्त्यावरील घाटात दोन मोटार सायकलींवरील ४ जणांवर संशय आल्याने त्यांचेवर छापा टाकून त्यांची झडती घेतली असता गोणीमध्ये ९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुस, २ रिकाम्या मैग्झिन मिळून आले. तसेच त्यांच्याकडून चार मोबाईल दोन मोटरसायकली असा एकुण ४,०७,४००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संशयित आरोपी हरजनसिंग प्रकाशसिंग चावला (वय २०) रा. पारउमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी, (म.प्र), मनमीतसिंग धृवासिंग बर्नाला (वय २०) रा. पारउमर्टी, ता. वरला, जिल्हा बडवाणी (म.प्र), अलबास दाऊद पिंजारी (वय २७) रा. महादेव चौक बाजार पेठ हरिविठ्ठल नगर, जळगाव ता. जि. जळगाव, अर्जुन तिलकराज मलीक (वय २५) रा. एकता नगर, चमरंग रोड अमृतसर, पंजाब यांच्यावर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गु.र.नं.३९/२०२४ भा.द.वि. कलम-३५३, ५०४, ३२३, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५, म.पो. अॅक्ट कलम ३७(१) (३) चे उलंघन १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. कावेरी कमलाकर, पोहेकाॅ शशीकांत पारधी, किरण पाटील, पोकों गजानन पाटील, संदिप निळे, होमगार्ड धावऱ्या वारेला, सुनिल धनगर, श्रावण तेली, संदिप सोनवणे सर्व नेमणुक चोपडा ग्रामीण पो.स्टे. यांनी केली आहे. तसेच अलवास दाऊद पिंजारी वय २७ वर्षे, रा. महादेव चौक बाजार पेठ हरिविठ्ठल नगर जळगांव ता. जि. जळगांव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर राज्यात एकुण ९ ते १० गुन्हे दाखल आहेत.