जळगाव, दि.१० – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी बैठकीचे आयोजन दि. १३ व १४ जानेवारी जळगावात करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यानिमित्ताने राज्य अध्यक्ष, राज्य कार्याध्यक्ष यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. तसेच, दि. समितीच्या दोन विभागांच्या अभियानाचे कार्यक्रमदेखील विविध महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे यांनी दिली.
महाराष्ट्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी बैठकीचे वर्षातून तीनवेळा आयोजन होत असते. या बैठकीचे आयोजन यंदा खान्देश विभागात होत असून १४ वर्षानंतर राज्य कार्यकारिणी बैठक जळगावात होत आहे. या बैठकीनिमित्त राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, चारही राज्य प्रधान सचिव यांच्यासह राज्याचे सर्व पदाधिकारी, ३४ जिल्ह्यांचे जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव हे उपस्थित राहणार आहे.
बैठकीचे आयोजन हे अजिंठा चौकातील मंगलम हॉल येथे करण्यात आलेले असून दि.१३ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होईल. तसेच, दिवसभर बैठकीनंतर संध्याकाळी समविचारी, हितचिंतक यांची संवाद बैठक आयोजित आहे. दि.१४ रोजी बैठकीचा समारोप होईल, अशी माहिती प्रा. डी. एस.कट्यारे यांनी दिली. पत्रपरिषदेला जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी, जिल्हा पदाधिकारी प्रा. दिलीप भारंबे, शिरीष चौधरी, शहर शाखेचे सचिव गुरुप्रसाद पाटील आदी उपस्थित होते.