जळगाव, दि.07- पुणे येथे एका अल्पवयीन मुलीवर तेरा तरुणांनी अत्याचार केला. या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी जळगाव शहरातील सर्व धर्मीय विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
व्याभिचार करणाऱ्यांना जात-धर्म नसतो. त्यांना कठोर शासन करावे, त्यामुळे दुसरे कोणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही, सदर आरोपींविरुद्ध जलद न्यायालयात खटला चालवून 30 दिवसाच्या आत निकाल लावा व फाशीची शिक्षा द्या. तसेच या घटनेत ज्या लॉज मालकांनी जागा उपलब्ध करून दिली, तसेच ज्या रेल्वे स्टेशन परिसरात अनैतिक कृत्य केले तेथील जीआरपीएफ यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरदारीचे अध्यक्ष फारुक शेख, सल्लागार समितीच्या सदस्या निवेदिता ताठे, शिवसेना महानगराध्यक्ष जाकिर पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस ममता तडवी, काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमजद पठाण, समाजवादी पार्टी महिला अध्यक्ष साजिया इक्बाल, जामा मस्जिदचे सय्यद चाँद, शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मोयनोद्दीन शेख, हिंदू मुस्लिम एकता फाउंडेशनचे अध्यक्ष युसूफ खान, जळगाव जिल्हा पोलीस बॉईज चे उपाध्यक्ष समीर शेख यांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी यांच्या वतीने महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भालोदे यांनी निवेदन स्वीकारले व आपल्या भावना शासनाला कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.