जळगाव, दि. ०५ – नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांना लोकसेवक असलेल्या खासदारांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी निषेध करीत गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी जोरदार आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करीत खासदार हेमंत पाटील यांच्या गैरकृत्य केल्याचा आरोप करत निषेध केला. डॉक्टरांविषयीचे गैरवर्तन महाराष्ट्रात थांबले नाही तर भविष्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदनामधून देण्यात आला आहे.
दरम्यान जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, कनिष्ठ निवासी डॉक्टरांची संघटना (मार्ड) आणि महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनांतर्फे घोषणाबाजी देत गुरुवारी अधिष्ठाता कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.
यावेळी संबंधित दोषींवर राज्य शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यासंदर्भातील निवेदन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांना देण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, सचिव डॉ. योगिता बावस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. किशोर इंगोले, डॉ. गिरीश ठाकरे, डॉ. जोतीकुमार बागुल, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. संगीता गावित, डॉ. संजय बनसोडे, डॉ. कुणाल देवरे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. रोहन पाटील, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. सुनयना कुमठेकर यांच्यासह कनिष्ठ निवासी डॉक्टर्स संघटनेचे (मार्ड) अध्यक्ष डॉ. च् बाजड, डॉ. तुषार राठोड, डॉ. नम्रता वाघ उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेचे सचिव आदिनाथ काळणार, सर्वेश काबरा, अनुष्का मानधे, कृष्णा कराड, ओमकार वरुडे, गौरव काटोले, अक्षय साळवे, शितल बलाना आदींनी सहभाग घेतला.