पाचोरा, दि.१० – येथील भडगाव – पाचोरा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्याकडून थेट धमकी मिळालेल्या पत्रकाराला बुधवारी संध्याकाळी वार्तांकन करून परतत असताना अज्ञात गुंडांनी नगरपालिकेसमोर भर रस्त्यात दुचाकीवरून पाडत त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावरून पाचोरा पोलीस स्टेशनला पत्रकार संदीप महाजन यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप महाजन हे पाचोरा शहरात पत्रकारिता करतात. त्यांच्या परिवारासह पाचोरा शहरात राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एक वृत्त प्रसारित केले होते. त्यावेळी किशोर पाटील यांनी वाईट वाटून त्यांना फोन करून शिवीगाळ करीत धमकी दिली होती. तसेच शिवीगाळ केल्याबद्दल त्यांनी माध्यमांच्या समोर कबूलही केले होते. या घटनेनंतर मात्र पाचोरा शहरात संमिश्र पडसाद उमटले होते. संदीप महाजन यांनी पोलिसांकडे पोलीस संरक्षणाची मागणी करत आमदार किशोर पाटील यांच्यापासून स्वतःला व कुटुंबीयांना धोका असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण देण्यात आले नव्हते.
बुधवारी ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते रेल्वेच्या आंदोलनाची बातमी घेऊन त्यांच्या घरी जात असताना महानगरपालिकेसमोर अज्ञात गुंडांनी त्यांच्या तोंडावर रुमाल फेकत दुचाकीवरून खाली पाडले. त्यानंतर चार ते पाच गुंडांनी लाथा बुक्क्यांनी तुडवत त्यांना बेदम मारहाण केली. आमच्या किशोर आप्पाच्या नादी यापुढे लागलास तर याद राख अशी धमकी त्यांना गुंडांनी दिल्याचा आरोप पत्रकार महाजन यांनी केला.