पारोळा, दि.०६ – मनुष्य जीवन हे खुप अनमोल आहे. भाग्यवानालाच हा मनुष्यरुपी जन्म मिळतो. तो मिळालाच तर त्याला आयुष्यात खऱ्या अर्थाने गुरुचे पाठबळ लागते. ते असल्याशिवाय जीवन सुखकर होऊ शकत नाही. असे प्रतिपादन वसंतनगर ता. पारोळा येथील वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी पारोळा येथील ब्रह्मलीन श्री श्री १००८ महामंडलेश्वर रामचैतन्य बापु तपोभूमी प्रथम आश्रम श्री. चैतन्य सेवा आश्रम येथे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमाला पारोळा येथील चैतन्य सेवा आश्रमाचे संचालक दगडू महाराज नंदुरबार येथील प्रकाश पुरी महाराज, हिवरखेडा येथील शिवदास महाराज, बोळे तांडा येथील भगवतगिरी महाराज, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, वर्षा पाटील, पारोळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष महाजन, शहर अध्यक्ष कपिल चौधरी, स्त्री रोग तज्ञ डॉ. वैशाली नेरकर, आई फॉउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मोहाडी येथील सरपंच रामचंद्र पाटील, जितेंद्र वाणी, गिरीश टोळकर, राजाराम पाटील बछराज दलपत जाधव, किशोर इंदल जाधव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..
याप्रसंगी रामचैतन्य भक्त परिवार, भजनी मंडळाने भजन गीताचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. स्त्री रोग तज्ञ डॉ. वैशाली नेरकर यांनी आरोग्य तपासणी केली. यासाठी आई फॉउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. दुपारी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी पारोळा तालुका, जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंतनगर ता. पारोळा येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळा मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.