जळगाव, दि.११ – कृषि विद्यापीठे, सरकारी यंत्रणा आणि कृषि उद्योजकांनी शेती संशोधनाविषयी एकत्रीतपणे कार्य केले तर शेतकऱ्यांना सन्मानस्थितीत आणता येईल आणि यातून देश सदृढ होऊन सुपर पॉवर होईल असाही विश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी व्यक्त केला. ‘कांदा, लसूण व्यवस्थापन, शाश्वत उत्पादन व मूल्य साखळीतील उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच व्यापार.’ याविषयावर तिसरा राष्ट्रीय परिसंवाद जैन हिल्सवरील गांधीतीर्थच्या, कस्तुरबा सभागृह येथे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनिल जैन बोलत होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून एकरी सर्वाेच्च उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सपत्नीक स्व. सौ. कांताबाई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. आकर्षक सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, साडी आणि २१ हजाराचा धनादेश असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., आय सी ए आर, कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर, पुणे, इंडियन सोसायटी ऑफ एलियम, राजगुरूनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या परिषेदचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत जगभरातील कांदा व लसूण शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक उपस्थित आहेत.
परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, आयएसए अध्यक्ष डॉ. के. ई. लवांडे, डॉ. एच. पी. सिंग, डॉ. एस. एन. पुरी, डॉ. विजय महाजन, डॉ. मेजर सिंग, डॉ. सुधाकर पांडे, डॉ. ए. जे. गुप्ता, डॉ. पी. के. गुप्ता, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. निरजा प्रभाकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
यावेळी अनिल जैन पुढे बोलताना म्हणाले की, शेत, शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा धर्मापेक्षाही मोठी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पांढरा कांदामध्ये संशोधन करून त्याचे उत्पादन वाढविले. करार शेतीतून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा जैन इरिगेशनच्या माध्यमातून मिळवून दिला. व्यवसाय वृद्धीमध्ये शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांची मोलाची भागीदारी असून शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कंपनी आहे. समाजाचा कणा असलेला शेतकऱ्याला संशोधन तंत्रज्ञान सहज सोप्या पध्दतीने प्राप्त व्हावे हाच कुठल्याही संशोधनाचा उद्देश असावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शास्त्रज्ञांनी नवीन जातींवर संशोधन करावे यासाठी जैन इरिगेशन सर्वतोपरी प्रोत्साहन देईल असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक डॉ. के. ई. लवांडे यांनी केले. त्यात ते म्हणाले, भवरलालजी जैन यांनी अवघ्या सात हजार रूपयांच्या भांडवलावर आज १२ हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध केला. जलपुर्नभरण, मृदसंधारण, ठिबक सिंचन, सौर ऊर्जा व जैवतंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखविला. या नाविन्याचा ध्यास घेणाऱ्या जैन इरिगेशनला ही परिषद सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले. दीपक चांदोरकर यांनी गुरूवंदना म्हटली. सुत्रसंचालन डॉ. राजीव काळे यांनी केले. डॉ. विजय महाजन यांनी आभार मानले.
जैन फार्मफ्रेश फुड्सचा स्क्रोल ऑफ ओनर्स आणि अवार्ड ऑफ एक्सलेंस ने गौरव..
नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च फाउंडेशन यांना ओनर्स पुरस्काराने मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले. जैन फार्मफ्रेश फुड्स लिमिटेड यांचा स्क्रोल ऑफ ओनर्स आणि अॅवार्ड ऑफ एक्सलेंसने गौरव करण्यात आले. हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार डॉ. एच. पी. सिंग, डॉ. के. ई. लवांडे, डॉ. एस. एन पुरी या मान्यवरांच्या हस्ते जैन फार्मफ्रेश फुडूस कंपनीच्या वतीने अनिल जैन, डॉ. अनिल ढाके, गौतम देसर्डा, रोशन शहा, संजय पारख, सुनील गुप्ता, व्ही. पी. पाटील यांनी स्वीकारला. जैन फार्मफ्रेश फूडस लि. चे कार्य अधोरेखित करत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि उच्च तंत्रज्ञान पोहचविणे, करार शेतीच्या माध्यमातून हमी भाव देऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये सहभागी झाल्याने हा सन्मान करण्यात आला.