जळगाव, दि.२४ – आपल्या देशात अनेक मतभेद, जातीभेद, धर्मभेद, व्यक्तीभेद असे भेद आहेत, परंतु हे भेद न मानता आपण सर्वांनी एक रहावे व वागावे. कोणीही कधीही कोणाला फसवू नये. प्रत्येकाने आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे, असे मार्गदर्शन बीड येथील कथाकार साईगोपालजी देशमुख महाराज यांनी जळगावात केले.
मेहरूण येथील श्री साईबाबा मंदिराच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने “दरबार मेरे साई का” या चार दिवसीय साईकथेचे २२ ते २५ जानेवारी दरम्यान संध्याकाळी ७.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी कथाकार साईगोपालजी देशमुख महाराज यांनी कथा सुश्राव्य केली.
सुरुवातीला मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीला आणि प्रतिमेला महाराजांनी माल्यार्पण करून पूजन केले. प्रस्तावनेतून नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मंदिराविषयीची माहिती देऊन साईकथेविषयी माहिती दिली. त्यानंतर कथेस महाराजांनी प्रारंभ केला. कथेत राज सिंधी व भूषण सोनार यांनी “भर दो झोली मेरी या मोहम्मद” हि कव्वाली तर ‘गणेश वंदना’ हि शुभम बोऱ्हाडे यांनी सादर केली. “गोंधळ” भूषण सोनार यांनी तर “आप मान जाओ साई” हा मुजरा शशिकांत सरोदे यांनी सादर केला.
कथाकार साईगोपालजी देशमुख महाराज म्हणाले की, साईबाबा सर्वांना फार आवडायचे. बाबांमध्ये व मुलांमध्ये अतिशय जवळीकतेच नात निर्माण होत असे. बाबा म्हणत ‘मुलांना शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे. कमीत कमी दिवसाकाठी एखाद्याच्या तरी उपयोगाला पडा व मदत करा, असा संदेश साईबाबा द्यायचे. गरीबी ही कायम नसते आणि श्रीमंती टिकून राहत नाही. असा भेदभाव आपण करू नये. कोणीही माणूस उच्च व निच नसतो. सर्वजण सारखे असतात. असे साईबाबांसह संतांनी सांगितले आहे, असेही महाराज म्हणाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील माजी सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर देशमुख उपस्थित होते. साईकथा दररोज संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होते. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.