जळगाव, दि.०९ – शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने जळगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून योगेश पाटील यांना ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने नगर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक कवी फ.मु. शिंदे यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरीया होत्या. यावेळी संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नागेबाबा उद्योग समुहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, पुरुषोत्तम गड्डम, संभाजी पाटील उपस्थित होते.
नाशिक येथील शिवपुत्र संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था या राष्ट्रीय उपक्रमशिल संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक तथा राजकिय व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
या कार्यक्रमात आमदार निलेश लंके, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, योगेश पाटील, डॉ.पीयुष पाटील, राहुल पवार, डॉ.मोसिम शेख, साहेबराव मेंगडे, भानुदास मस्के यांचा राज्यस्तरीय शिवपुत्र पुरस्काराने व वीर पत्नी छाया उदार, रुपाली कदम, शीतल महाले यांचा राज्यस्तरीय शिवकन्या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवकन्या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांची संस्थेने दखल घेतली आहे. समाजकार्यातुन राष्ट्रउभारणीचा पाया उभा राहतो. त्यासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रास्ताविकात जगन्नाथ पाटील म्हणाले.