जळगाव, दि. १९ – संत व समाज सुधारकांचे विचार पुढे नेण्यासाठी कीर्तन, प्रवचन हे माध्यम पुढे चालत राहिले पाहिजे. यासाठी तरुणांनी किर्तन परंपरा जोपासण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मार्गदर्शन चिखली येथील ह.भ.प. दिनेश महाराज यांनी केले.
मेहरूणमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्री चिखली येथील कीर्तनकार हभप दिनेश महाराज यांनी प्रभावी शैलीमध्ये भाविकांचे प्रबोधन केले.
दिनेश महाराज पुढे म्हणाले की, आध्यात्मिक क्षेत्र हे मन:शांती प्राप्त करून देणारे क्षेत्र आहे. देवीदेवतांची आणि संत समाज सुधारकांची परंपरा कीर्तन आणि प्रवचन परंपरा पुढे नेत आहे. चांगल्या विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे. आत्मिक सुख मिळाले पाहिजे. कीर्तन परंपरा जोपासली तर त्यातून मानसिक विकास तर होतोच पण समाजाला योग्य दिशा दाखवता येते असा मूलमंत्र हभप दिनेश महाराजांनी दिला.
यावेळी आयोजक नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह मेहरुण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जांभूळधाबा येथील ज्ञानदेव महाराज कीर्तन करणार आहेत.