जळगाव, दि. २४ – दिवाळी हा भारतातील महत्वाचा सण आहे. आनंद आणि उत्सवाचा हा सण संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन तर्फे तालासुरात साजरा करण्यात आला. भाऊंच्या उद्यानात दिवाळीची पहाट सुरांनी सजली होती. हवेतील गारठा आणि वाद्यांच्या तालावर रसिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला माजीमंत्री गुलाबराव देवकर, भरत अमळकर, डॉ राहुल महाजन, नंदू अडवाणी, विजय काबरा, किरण बच्छाव, नारायण बाविस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिवे लावून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
परिवर्तनच्या कलावंतांनी राजस्थानी, अहिराणी, मल्याळम कन्नड, तमिळ, स्पॅनिश, हिंदी आणि मराठी अशा आठ भाषांतील गाणी सादर केली. गायिका ऐश्वर्या परदेशी, प्रशांत साळुंखे, हर्षदा कोल्हटकर यांनी उठी उठी गोपाला, पांडुरंग नामी, बाजे मुरलीया, हे सुरांनो चंद्र व्हा अशी अनेक गाणी गायली. प्रतिक्षा कल्पराज यांनी खान्देशातील वही हा प्रकार सादर केला.
साक्षी पाटील यांनी बंगाली गीत गायले. लोकगीत गायक बुद्धभूषण मोरे यांनी देवीचा गोंधळ सादर केला. दिवाळीचं महत्व आणि भारतीय परंपरा, संस्कृती याविषयी सांगत अतिशय सुंदर निवेदन रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी केले. यावेळी कीबोर्डवर नितीन पाटील यांनी तबलयावर भूषण गुरव, संवादिनीवर भूषण खैरनार यांनी साथसंगत केली. सांगीतिक मैफिलीचा समारोप जागृती भिडे, साक्षी माळी, हेतल पवार यांच्या नृत्याने झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगकर्मी मंगेश कुलकर्णी यांनी केले. या मैफिलीसाठी माजी महापौर भारती सोनवणे, कैलास सोनवणे, विनोद देशमुख, अश्विनी देशमुख, नगरसेवक अनंत जोशी, डॉ. राधेश्याम चौधरी, प्राचार्य एस एस राणे, डॉ शशिकांत गाजरे, डॉ. रेखा महाजन, डॉ. रवी महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. दिवाळी पहाट मधील संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना शंभु पाटील यांची होती. तर दिग्दर्शन सुदिप्ता सरकार यांनी केले. निर्मिती परिवर्तन जळगावने केली. यशस्वितेसाठी राहुल निंबाळकर, शरद पाटील, पंकज पाटील, सुनीला भोलाने यांनी परीश्रम घेतले.