जळगाव, दि. १३ – परिवर्तन चित्र साक्षरता हे केवळ अभियान नाही तर चित्रकारांसाठी आत्म निरीक्षणाची मोठी संधी आहे, राजू बाविस्कर विजय जैन विकास मलारा या तीन चित्रकारांची राष्ट्रीय पातळीवर झालेली निवड आणि त्यामुळे खान्देशातील चित्रकला आता देश पातळीवर ती मान्यता पावली. याचं कारण म्हणजे परिवर्तने केलेलं गेल्या दशकभरातील काम आहे. अशी भावना सर्वच मान्यवरांनी रविवारी परिवर्तन चित्र साक्षरता कार्यक्रमात व्यक्त केली.
पंकज वानखेडे यांच्या चित्रांचे चित्रदर्शन सध्या पु ना गाडगिळ गॅलरीत भरले आहे. यानिमित्ताने परिवर्तन चित्र साक्षरता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अंजली गवळी, राजू बाविस्कर, यशवंत गरुड व नितीन सोनवणे या चित्रकारांच्या सोबत एन. ओ. चौधरी, एल. झेड. कोल्हे, श्याम कुमावत, विजय जैन, तरुण भाटे, सचिन मुसळे यासोबत अनेक नवे चित्रकार उपस्थित होते.
पंकज वानखेडे यांचे निसर्ग चित्र सुंदर असून वानखेडे यांची वाटचाल आता सुरू झालेली आहे. समूर्त कडून अमूर्त कडे असा चित्रकलेचा प्रवास व्हावा. अशा शुभेच्छाही त्यांना देण्यात आल्या. चित्रकला व चित्र हे आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या व जीवनात आनंद निर्माण करत आपल्या माणूसपणाला तोलून धरणारी कला म्हणजे चित्रकला आहे. परिवर्तनने सर्व कलांना जोडून नवं सांस्कृतिक चैतन्य निर्माण केलं आहे . यासोबत परिवर्तनने यापूर्वीच वाचनसंस्कृती रुजवण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे . त्याच धर्तीवर आता चित्रकला घराघरात पोचावी असा प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.
त्यांच्या या उपक्रमाला खान्देशातील सर्व चित्रकार भरभरून प्रतिसाद देतील असे चित्रकार राजू बाविस्कर यांनी सांगितले. याप्रसंगी परिवर्तनच्या उपाध्यक्ष मंजुषा भिडे, नीलिमा जैन, प्रा. मनोज पाटील, हर्षदा कोल्हटकर, प्रतीक्षा कल्पराज ,शरद पाटील, मंगेश कुलकर्णी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक हर्षल पाटील यांनी केले.