जळगाव, दि. ०२ – ‘जमिनीची सुपिकता आणि मर्यादा पाहता उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट पद्धतीने शेती करणे भविष्यात खूप महत्त्वाचे ठरेल. शेती व्यवसायातून आपली स्वत:ची उन्नती तर साध्य होते परंतू भूकेल्यांच्या पोटाला अन्न देण्याचे काम शेतकरी करतो, त्यामुळे तो जगाचा पोशिंदा ठरतो. भविष्यात शेतीशिवाय सर्वांगिण प्रगती करणे केवळ अशक्य!’ असा सूर फालीमधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना शेतकऱ्यांमध्ये उमटला.
जैन हिल्स येथे फालीचे आठव्या संम्मेलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरवात बुधवारी झाली. याप्रसंगी आघाडीच्या प्रगतीशील शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्सच्या आकाश मैदानावर सुसंवाद साधला. यात उमाळे येथील उमेश खडसे, पिंपळगावचे भागवत भाऊराव पाटील, पहुरचे शैलेश कृष्णा पाटील, नायगावचे विशाल किशोर महाजन, अटवाड्याचे विशाल अग्रवाल या शेतकऱ्यांचा समावेश होता. पहुर येथील शैलेश पाटील यांनी आपल्या शेती अनुभव कौशल्याचे भंडार विद्यार्थ्यांनसमोर खुले केले.
विशाल अग्रवाल यांनी जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून केळी, हळद, भगवा डाळिंब टिश्यूकल्चर, अति सघन आंबा लागवड, जैन स्विट आॕरेंज असे फलोत्पादन, पांढरा कांदा, कापुस, आले, सोयाबीन, तुर, करार शेती याबाबत अनुभव सांगितले. उमाळे येथील उमेश खडसे यांनी टरबुजाचे उत्पादनात ठिबक व तंत्रज्ञानाचा वापराबाबतचा फायदा याबाबत सांगितले. आॕटोमेशनामुळे होणारी पाण्याची बचत यावर विशाल महाजन यांनी संबोधले. फालीच्या काही विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी प्रश्नोत्तर स्वरूपात संवाद साधला. सूत्रसंचालन रोहिणी घाडगे यांनी केले.
फाली संम्मेलन १ व २ तसेच ४ व ५ जून या दिवशी दोन भागात होईल. संम्मेलनासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील १३५ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांमधून ८०० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी फालीच्या पहिल्या टप्प्यातील संम्मेलनासाठी महाराष्ट्रातील ६७ शाळांमधील ४०० फाली विद्यार्थी व ४० ए. ई. (अॅग्रिकल्चर एज्युकेटर) यांनी सहभाग घेतला.
फालीला ज्या कंपन्यांनी पुरस्कृत केले आहे त्या कंपन्यांचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते. जैन इरिगेशन फालीच्या आठव्या संम्मेलनाचे प्रायोजक असून जैन इरिगेशनसह गोदरेज अॅग्रोव्हेट, यूपीएल, स्टार अॅग्री आणि ओम्निव्होर या कंपन्या फालीला पुरस्कृत करतात. भविष्यात फालीला प्रायोजित करू शकणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा रॅलीज, महिंद्रा, आइटीसी, अमूल आणि दीपक फर्टिलायझर यांचा समावेश आहे.
जैन इरिगेशनचे आस्थापनांसह गांधीतीर्थला भेट..
फालीच्या पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कृषिसंबंधीत विविध प्रकल्पांना भेटी दिल्यात. कृषितज्ज्ञांशी संवाद साधला. भविष्यातील शेतीविषयी जाणून घेतले. दिवसभरात विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थसह अत्याधुनिक पद्धतीने फळबागेची लागवड कशी केली जाते, याबाबत प्रत्यक्ष शेतात जाऊन सघन लागवड पद्धतीत आंबा व संत्रा उत्पादनाचे प्रात्यक्षिक बघितले. शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवारफेरीतून टिश्यूकल्चर तंत्रज्ञान समजून घेतले. संशोधनाच्या दृष्टीने जैन इरिगेशनच्या आर अॅण्ड डी लॅबमधील तज्ज्ञांशी संवाद साधला. सोलर पार्क, बायोपार्क, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, सिंचन प्रकल्प यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतले.
कृषि व्यवसाय योजना, इन्होवेशन मॉडल्सचे गुरूवारी सादरीकरण..
फाली विद्यार्थ्यांचे गट त्यांचे कृषि व्यवसाय योजना आणि इन्होवेशन मॉडल्स आज सादर करतील. बडी हांडा हॉल, परिश्रम, गांधी तीर्थ सभागृहात प्रत्येक हॉलमध्ये किमान २३ व्यवसाय योजना आणि एकूण ६७ असे सादरीकरण होईल. तसेच आकाश मैदानावर ६७ नाविन्यपूर्ण इन्होवेशन मॉडल्स यांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. यातील विजेत्या स्पर्धेक गटांना पारितोषिक देण्यात येतील. याप्रसंगी फाली उपक्रमाला पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी सुसंवाद साधतील. यूपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन फालीच्या विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधतील. तर जैन फार्मफ्रेशचे संचालक अथांग जैन यावेळी मनोगत व्यक्त करतील.