जळगाव, दि.२५ – ऑर्किड मल्टी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटल येथे ५३ वर्ष वयाच्या रुग्णांवर मार्च महिन्यात दुर्मिळ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली. मुंबई येथील डॉ. राहुल कैचे व त्यांच्या सर्जिकल टीमने हि शस्त्रक्रिया जळगावात पूर्ण केली. आजपर्यंत जगामध्ये फक्त ३२ रुग्णांवर म्हणजेच उजव्या बाजूला हृदय असलेल्या (डेक्सट्रोकार्डिया) अशी शस्त्रक्रिया झालेली आहे.
महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया जळगावच्या शेख गुलाम रसुल शेख या रूग्णावर झाली असल्याचे हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल कैचे यांनी बुधवारी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी डॉ. परेश दोषी, प्रिती दोशी, डाॅ. उदयसिंग पाटील, डॉ. प्रशांत बोरले आदी उपस्थित होते.
सर्वसाधारणपणे आपले हृदय छातीच्या पिंजऱ्यात डाव्या बाजूला असते, परंतु सदर रुग्णाचे हृदय हे छातीच्या उजव्या बाजूला (डेक्सट्रोकार्डिया) होते. जगात सर्वसाधारणपणे १२००० नवजात अर्भकांमधून एक अर्भक असे प्रमाण आहे. डेक्सट्रोकार्डिया मुळे ही एक अत्यंत गुंतागुंतीची व आव्हानात्मक शस्त्रक्रिया असते. तसेच सदर रुग्ण शेख गुलाम यांची हृदय कार्यक्षमता ( LVEF ) ३० % च होती. त्यामुळे ही एक अत्यंत उच्च जोखमीची हृदय – शस्त्रक्रिया हृदयाचे कार्य सुरु ठेऊन ( बिटिंग हार्ट ) पद्धतीने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
शेख यांच्यावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ.राहुल कैचे व सर्जिकल टीम, डॉ. परेश दोषी, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. प्रशांत बोरले, डॉ. प्रफुल्ल काबरा, आय.सी.यू. टीम डॉ. समीर लोहार (भुलतज्ञ) तसेच ऑर्किड हॉस्पिटल मधील कुशल नर्सिंग टीमचे विशेष योगदान लाभले. जळगावातील ऑर्किड मल्टी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटल मध्ये मागील ८ वर्षात १५०० पेक्षा जास्त रुग्णांवर डॉ. राहुल कैचे आणि डॉ. योगेश बेलापूरकर व सर्जिकल टीमने हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.