जळगाव, दि.२२- “साहित्य, नाट्य, संगीताचे विविध कार्यक्रमांचे महोत्सव घेऊन परिवर्तन संस्था जळगाव “महोत्सव संस्कृती” रुजवत असल्याचे मत “स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवाच्या” समारोप प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.
परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आयोजित तीन दिवसीय “स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सव ”
समारोप आ. शिरीषदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी पद्मश्री डॉ भालचंद्र नेमाडे, पद्मश्री कविवर्य ना धों महानोर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, आ. चिमणराव पाटील, आ. शिरीष चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, भरत अमळकर, जे. के. चव्हाण, शिरिष बर्वे, अंजली पाटील हे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आबा महाजन यांचा गौरव कविवर्य ना धों महानोर व भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मानपत्राचे वाचन रंगकर्मी मंगेश कुलकर्णी यांनी केले. आ. शिरिष दादा चौधरी यांनी परिवर्तनच्या कार्याचा व उपक्रमांचा गौरव केला. साहित्य व संगीत हे जगण्यासाठी महत्त्वाचे असतात, परिवर्तन खानदेशात उत्तम कार्यक्रमांची निर्मिती करत आहे, असे गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी संत कबिराच्या दोह्यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. शंभू पाटील यांनी आपल्या खास शैलीत दोह्यांचं, तत्वज्ञानाचं निरुपन केले. मन लागो यारा फकिरी मे, केछो दिन मोने मोने, धुंघट के पट खोल, चदरीया झिनी झिनी यासारखे अनेक दोहे, भजन, उलटबासी सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे होते तर संगीत संयोजन मंजुषा भिडे यांचे होते. कार्यक्रमात सुदिप्ता सरकार, श्रद्धा पुराणीक कुलकर्णी, निखिल क्षिरसागर, विशाल कुलकर्णी, रजनी पवार, प्रतिक्षा कल्पराज, हर्षदा कोल्हटकर, साक्षी पाटील, सुयोग गुरव, भुषण गुरव यांनी गीते सादर केली. वादक मनीष गुरव, बासरीवर योगेश पाटील यांनी साथसंगत केली.