मुंबई, दि.१६ – दादर येथे नुकताच संपन्न झालेल्या ४९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेने अत्यंत सुरेख खेळाचे प्रदर्शन करीत उपविजेते पदासह रोख १५ हजार रूपये, चषक व प्रशस्ती प्रमाणपत्र पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले. याच बरोबर ऑक्टोबरमध्ये मलेशिया येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धासाठी तिची चार सदस्य भारतीय संघात निवड झालेली आहे.
तत्पूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीत निलम घोडकेने तामिळनाडूच्या अस्विका एच. हिचा, उपांत्यपूर्व फेरीत पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या तुबा सहेरचा तसेच उपांत्य सामन्यात भारतीय एअरपोर्ट प्राधिकरणच्या मंतशा इक्बाल हिचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत मात्र पेट्रोलियम स्पोर्टसच्या काजल कुमारी विरुद्ध चुरशीच्या सामन्यात १२-१५ आणि १०:१५ अशी पराभूत झाली.
ह्याच स्पर्धेत पुरुष एकेरी गटात अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशच्या अब्दुल रहमान ने रिझर्व बँकेच्या जहीर पाशा यांचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले तर जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रीपणकरण याने सहावे स्थान प्राप्त केले. आंतरसंस्था पुरुष सांघिक अजिंक्यपद गटात जैन इरिगेशनने सिविल सर्विसेस संघाचा २-१ ने पराभव करून तृतीय क्रमांक पटकाविला.
जैन इरिगेशनच्या नीलम घोडके हिच्या नेत्रदीपक कामगिरी तसेच विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरीता भारतीय संघात झालेल्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यस्थापकीय संचालक अतुल जैन, क्रिडा समन्वयक अरविंद देशपांडे व इतर सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून आगामी स्पर्धांकरीता शुभेच्छा दिल्या.
जैन इरिगेशन संघ पुढीलप्रमाणे..
पुरुष संघ – पंकज पवार (कर्णधार), अनिल मुंडे ,अभिजित त्रीपणकर, योगेश धोंगडे ,रहिमखान व नईम अन्सारी यांचा समावेश असेल.
महिला संघ – आयशा खान (कर्णधार), नीलम घोडके , मिताली पिंपळे, पुष्करणी भट्टड, संघ व्यवस्थापक मोहम्मद फजल कासार व सय्यद मोहसीन हे होते.