हेमंत पाटील | जळगाव, दि.१५ – एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन भडगाव येथील बापूजी युवा फाउंडेशनतर्फे तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत वेळेवर पाेहाेचविण्यासाठी मोफत बस सेवेचा कौतुकास्पद उपक्रम सुरू करण्यात आलायं. बापूजी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लखीचंद पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जातोय. दरम्यान तीन बसेसमधून दोन फेऱ्यांमध्ये ३०० परीक्षार्थी या माेफत बस सेवेचा लाभ घेताहेत.
बापूजी युवा फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाचा ताण मिटल्याने चांगल्या पद्धतीने आपली परीक्षा देता येत असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. हि बस सेवा कजगाव-वाडे गट, वडजी-गुढे गट तर तिसरा आमडदे-गिरड गट आहे. या तिन्ही गटांत रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गावात बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येते त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहोचणे शक्य होत आहे.
लखीचंद पाटील आणि बापूजी युवा फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमामुळे भडगाव तालुक्यातून फाऊंडेशनचे कौतुक होत असून, यापुढेही फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घडो, हीच अपेक्षा..
VIDEO










