यावल, दि.०४ – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यावल येथील शेख अजहर शेख समसुद्दीन, भाऊ गृप, इस्लामपूर बॉईज, आर्यन बॉय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात मोफत इसीजी कार्डिओग्राफ, मधुमेह, रक्तदाब तपासणी करण्यात आली.
शहरातील आठवडेबाजार जवळील इस्लामपूरा येेथे सर्वप्रथम रुग्णांची नावनोंदणी करण्यात आली. रुग्णांचे लक्षण जाणून घेत निष्णात डॉक्टरांनी मोफत सल्ला दिला. यात मुतखडा, नेत्रविकार, मुत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्ताशय खडा, थायरॉईड, पाईल्स, आतड्यांचे क्षयरोग, लिव्हरचे आजार, गर्भाशयाचा ट्यूमर, अंडाशयाच्या गाठी आदी प्रकारच्या आजाराने रुग्ण त्रस्त असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान शिबिरात १८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ६१ रुग्णांना सोनोग्राफी किंवा विविध रक्त-लघवीच्या तपासण्या याशिवाय काही शस्त्रक्रियांची आवश्यकता भासली, त्यांना पुढील तारीख देऊन रुग्णालयात येण्याच सल्ला दिला. रुग्णांनी सोबत येतांना ओरिजिनल आधार कार्ड व रेशन कार्ड आणण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यामुळे रुग्णांना रुग्णालयातही मोफत उपचार मिळणार आहे.
आरोग्य शिबिर यशस्वीतेसाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे दिपक पाटील, तुषार सुरे, किशोर महाजन, यावलमधील शेख अजहर शेख समसुद्दीन, भाऊ गृप, इस्लामपूर बॉईज, आर्यन बॉय यांचे अनमोल सहकार्य लाभले.
मानसिक आजारांवरही मार्गदर्शन
शिबिरामध्ये मानसोपचार तज्ञ डॉ.मुजाहिद शेख यांनी रुग्णांची तपासणी केली. यात डोकेदुखी, भास होणे, संशय येणे, दारुचे व्यसन, ताणतणाव चिंता, उदासिनता, लैगिंक समस्या, झोपेचे आजार व लहान मुलांमधील मानसिक समस्यांनी त्रस्त रुग्णांनी तज्ञांचा सल्ला घेतला.
यावेळी मेडिसीनचे डॉ.तेजस कोटेचा, सर्जरी डॉ.अनिश जोशी, नेत्र विभागातील डॉ.कल्पना देशमुख, स्त्रीरोग डॉ. विवेक कोल्हे, कान-नाक-घसा तज्ञ आकाश सोनवणे, हाडांचे डॉ.परिक्षीत पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना नर्सिंग स्टाफचे सहकार्य लाभले.