मुंबई, दि.१६ – सुप्रसिद्ध गायक तथा संगीतकार बप्पी लाहिरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी मुबईत निधन झाले. दरम्यान क्रिटिकेअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यावेळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं डॉक्टरांच्या हवाल्यानं दिलं.
रुग्णालयाचे संचालक डॉ दीपक नामजोशी यांनी पीटीआयला माहिती दिली की, बप्पी दा यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे मंगळवारी रात्री त्यांचं निधन झालं.
१९८० च्या दशकात त्यांनी आपल्या गाण्यांद्वारे लोकांची मने जिंकली होती. बप्पी लहिरी यांनी डिस्को डान्सर, शराबी आणि नमक हलाल यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये गाणी गायली. बप्पी दा अखेरचे बिग बॉस १५ मध्ये सलमान खानसोबत दिसले होते. शोमधील एका गाण्याच्या प्रमोशनसाठी आले होते.