जळगाव, प्रतिनिधी : रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२१ ते २०२४ या कालावधीत सहा वर्षीय बालिकेवर तिच्या चुलत मामाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पुणे येथे खासगी नोकरी करणाऱ्या एका महिलेची मुलगी जळगावातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात आजीकडे राहत होती. या ठिकाणी बालिकेचा चुलत मामाही येत होता. जानेवारी २०२१ ते २०२४ या कालावधीत बालिका घरात एकटी असताना त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

बालिकेने पुण्यात आईकडे गेल्यानंतर हा प्रकार तिला सांगितला. त्यानंतर आईने १६ नोव्हेंबर रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.








