जळगाव, प्रतिनिधी : BHR मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवी ठेवलेल्या हजारो ठेवीदारांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सहकारमंत्र्यांना सादर करण्यात आले.

BHR मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये हजारो ठेवीदारांनी आयुष्यभराच्या कष्टाची कमाई जमा केली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या ठेवी अडकून पडल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी व्याजासह परत मिळाव्यात, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

याशिवाय, अवसायकामार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा आणि जमा झालेल्या निधीच्या वितरणाचा सविस्तर तपशील सार्वजनिक करावा, ठेवी परताव्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी ठेवीदार तसेच मृत ठेवीदारांच्या वारसांना प्राधान्याने परतावा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच ठेवीदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आमदार सुरेश भोळे यांनी ठेवीदारांच्या आर्थिक अडचणी आणि त्यांच्या कुटुंबांवर ओढवलेल्या गंभीर परिस्थितीची सहकारमंत्र्यांना माहिती दिली. या प्रकरणात शासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक कार्यवाही करावी आणि ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांची परतफेड होणे आणि त्यांना न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका आमदार भोळे यांनी यावेळी मांडली.








