जळगाव, प्रतिनिधी : कंबरदुखी, पायात पसरणार्या तीव्र वेदना आणि चालणे-बसणेही कठीण करणार्या मणक्याच्या गंभीर आजारावर महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात प्रथमच एंडोस्कोपिक मोनोपोर्टल शस्त्रक्रिया करण्यात आली.

एका रुग्णाला गेल्या काही काळापासून तीव्र कंबरदुखी होती. त्यांच्या उजव्या पायापर्यंत वेदना पसरत होत्या. पायाला मुंग्या येणे, बधिरता जाणवणे, चालताना अडचण येणे तसेच वेदनेमुळे बसणेही अशक्य होत होते. या त्रासामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला होता. तपासणीसाठी त्या महादेव रुग्णालयात दाखल झाल्या.

याठिकाणी न्युरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अतुल जाधव, डॉ. विपूल राठोड यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या एमआरआयद्वारे निदान झाले. १० नोव्हेंबर रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मणक्याच्या प्रभावित भागातील डिस्कचा नसांवर येणारा दाब कमी करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर दुसर्याच दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर रोजी रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. कंबरदुखी आणि उजव्या पायात पसरणारी रॅडिक्युलर वेदना पूर्णपणे थांबली. रुग्णाला बसताना किंवा चालताना वेदना होत नसल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. प्रकृती समाधानकारक असल्याने १२ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मणक्याच्या आजारांवरील आधुनिक एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे योग्य रुग्णांची तपासणी करून कमीत कमी आक्रमक पद्धतीने उपचार करण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे.
महादेव रुग्णालयातील या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जळगाव जिल्ह्यातील प्रगत मणक्याच्या उपचार सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, शस्त्रक्रिया सहाय्यक, परिचारीका यांनी सहकार्य केले.
एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी म्हणजे काय?
एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही आधुनिक दुर्बिणीद्वारे केली जाणारी मणक्याची शस्त्रक्रिया आहे. यामध्ये छोट्या छिद्रातून कॅमेरा आणि विशेष उपकरणे वापरून नसांवरील दाब दूर केला जातो. त्यामुळे स्नायूंचे नुकसान कमी होते, वेदना कमी होऊ शकतात आणि रुग्ण लवकर पूर्ववत होऊ शकतो. परंतु योग्य शस्त्रक्रिया निवडणे हे रुग्णाच्या एमआरआय तपासणी, आजाराचे स्वरूप आणि शल्यचिकित्सकाच्या अनुभवावर अवलंबून असते.








