जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या शासकीय निवासस्थानी डंपिंग ग्राउंड परिसरातील कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या वंचित कुटुंबांतील बालकांसाठी एका आगळ्यावेगळ्या आणि संवेदनशील सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सानिका धिवरे आणि अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात वंचित मुलांना शासकीय निवासस्थानी स्नेहपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः मुलांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत, कौटुंबिक परिस्थितीबाबत आणि स्वप्नांबाबत आस्थेने विचारपूस केली.

तसेच मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. केवळ मदतीचा हातभार नव्हे, तर वंचित बालकांच्या स्वप्नांना बळ देणारा हा माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा उपक्रम संपूर्ण समाजसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.









