जळगाव, प्रतिनिधी : “जिवंतपणी घरातील ज्येष्ठांची सेवा करणे हेच सर्वात मोठे महापुण्य आहे. ज्येष्ठांच्या सेवेमुळे पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात आणि चारधामसह सर्व देवलोकही सदैव प्रसन्न राहतात,” असे उद्गार सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी यांनी काढले. १ ऑक्टोबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आणि पितृपक्षाचे औचित्य साधून धानोरा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात भव्य साहित्य वाटप सोहळा पार पडला, त्या प्रसंगी ते बोलत होते.

हा उपक्रम सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (दिव्यांग सक्षमीकरण विभाग, भारत सरकार), इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (जळगाव) आणि कॅ. आण्णासो नारायण पाटील बहुउद्देशीय संस्था (धानोरा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

वृद्धापकाळात येणाऱ्या शारीरिक मर्यादा विचारात घेऊन ज्येष्ठांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, या उद्देशाने गरजूंना व्हील चेअर, टॉयलेट कमोड, काठी (स्टिक), तसेच मान, गुडघा आणि कंबरेचे पट्टे यांसारख्या विविध सहायक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या मदतीमुळे वृद्धाश्रमातील व परिसरातील अनेक निराधारांना मोठा आधार मिळाला.

आपल्या मनोगतात मुकुंद गोसावी यांनी उपस्थितांना हसत-खेळवत निरपेक्ष व परोपकारी कार्याचे महत्त्व पटवून दिले आणि रेडक्रॉसच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष हुकूमचंद दत्तात्रय पाटील म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा अमूल्य ठेवा आहेत. त्यांच्या अनुभवांचा आदर करणे आणि त्यांच्या उत्तर आयुष्यात आरोग्याच्या व गतिशीलतेच्या समस्या दूर करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.”
या सोहळ्यास जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अशासकीय सदस्य मुकुंद गोसावी, केंद्रप्रमुख एस. पी. गणेशकर, संस्थेच्या अध्यक्ष उषाबाई रवींद्र पाटील, उपाध्यक्ष हुकूमचंद दत्तात्रय पाटील, वृद्धाश्रमातील कर्मचारी, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य स्वीकारताना वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे भाव दिसून आले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी व वृद्धाश्रम प्रशासनाने आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.








