जळगाव प्रतिनिधी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील वार्ड क्रमांक १५ मधील सेवा मंडळासमोरील गणेश विसर्जन मार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीची महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केली.

विसर्जन मार्गाची झालेली दुरवस्था पाहून महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित मक्तेदाराला दूरध्वनीवरून चांगलेच धारेवर धरले आणि उद्या सकाळपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची कडक तंबी दिली.
गणेश विसर्जन अवघ्या तीन दिवसांवर आले असतानाही महापालिका प्रशासनाकडून सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. शिवाय, स्थानिक मक्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खडी सांडली आहे. या खडीमुळे नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

विसर्जन मिरवणुकीत भाविकांना आणि गणेश मंडळांना या खड्ड्यांचा व खडीचा फटका बसू नये, यासाठी महापौरांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान रस्त्याची दुरवस्था पाहून महापौरांनी सोबत असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या मक्तेदाराला जागेवरूनच दूरध्वनी करून कडक शब्दांत कानउघाडणी केली. “उद्या सकाळपर्यंत या मार्गावरील सर्व खड्डे बुजवून सांडलेली खडी तात्काळ हटवण्यात यावी आणि रस्ता सुस्थितीत करण्यात यावा,” असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले.

या पाहणीप्रसंगी भाजपचे महापालिकेतील गटनेते तथा स्थानिक नगरसेवक प्रकाश बालाणी, महापालिकेचे अभियंता योगेश वाणी तसेच सेवा मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
हिंदी बातमी द्या









