यावल, (प्रतिनिधी) : यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डांभुर्णी येथे भरचौकात गावठी कट्ट्यातून (पिस्तूल) हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी येथील विद्यमान सरपंचाला यावल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मध्यरात्री जळगावमधून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझिनसह) आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.

विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी सरपंचाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २७ ऑगस्ट) रात्री ८ वाजेच्या सुमारास डांभुर्णी येथील चौकात एका इसमाने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. माहिती मिळताच पो.नि. धारबळे यांच्यासह पोउपनि मैनुद्दीन सय्यद, पोहेकॉ रोहिल गणेश, पोकॉ अनिल साळुंखे व पोकॉ हितेश बागुल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा डांभुर्णी येथील किनगाव रोडवरील ‘शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी’ दुकानाजवळ गोळीबार केलेल्या राउंडची रिकामी पुंगळी मिळून आली. परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता सदर गोळीबार सरपंच विकास सोळंके यानेच केल्याचे निष्पन्न झाले.

गोळीबार केल्यानंतर आरोपी जळगावकडे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोउपनि अनिल महाजन आणि पोकॉ सचिन पाटील यांना जळगावकडे रवाना करण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सोपान गोरे यांच्या पथकातील पोहेकॉ सलीम तडवी, पोकॉ प्रदीप चवरे व पोकॉ सचिन घुगे यांच्या मदतीने संयुक्त शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर रात्री १ वाजेच्या सुमारास आरोपी विकास सोळंके यास जळगाव येथील काळंका माता मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

दहशत पसरवण्यासाठी केला गोळीबार..
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे कोळन्हावी शिवारात ‘आदर्श हॉटेल, बिअर बार व परमिट रूम’ आहे. डांभुर्णी येथील काही मुले हॉटेलवर येऊन मोबाईलवर व्हिडिओ काढून त्रास देत असल्याने आणि आदल्या दिवशी (२६ ऑगस्ट) त्यांच्याशी भांडण झाल्याने त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी डांभुर्णी चौकात येऊन हवेत गोळीबार केल्याचे त्याने सांगितले. गोळीबारात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस त्याने कोळन्हावी शिवारातील स्वतःच्या शेतात लपवून ठेवले होते, जे पोलिसांनी जप्त केले आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोउपनि मैनुद्दीन सय्यद, पोउपनि अनिल महाजन, सपोनि हेमंत सांगळे, रोहिल गणेश, हितेश बागुल, सचिन पाटील, अनिल साळुंखे आणि संतोष पाटील यांनी केली. पुढील तपास पोउपनि मैनुद्दीन सय्यद करत आहेत.








