जळगाव |पाण्याचा प्रश्न आता उद्याचा राहिलेला नसून तो आजचाच प्रश्न आहे. पाऊस कधी आणि किती पडेल, हे आपल्या हातात नसले तरी पडलेले पाणी वाहून जाऊ न देता ते अडवणे आणि जमिनीत जिरवणे आपल्या हातात आहे. पाणीटंचाईवर दीर्घकालीन मात करायची असेल तर वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवावा लागेल. जलसंधारण हा केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता लोकसहभागातून त्याचे व्यापक लोकचळवळीत रूपांतर झाले पाहिजे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जलसंधारण दिनानिमित्त जळगाव येथील सागर पार्क येथे आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला जळगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा’चा संदेश

यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपवनसंरक्षक सौरीश सहाय, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले, कार्यकारी अभियंता विनोद पाटील, उत्तम दाभाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देत राज्यातील जलसंधारणाच्या कामाला व्यापक दिशा दिली. त्यांच्या जलसंधारण क्षेत्रातील कार्याची प्रेरणा कायम राहावी, यासाठी त्यांच्या जन्मदिनी २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा केला जातो.
प्रत्येक पाऊल जलचळवळीच्या दिशेने
“आज ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी झालेला प्रत्येक नागरिक या चळवळीचा खऱ्या अर्थाने भागीदार झाला आहे. आपल्या प्रत्येक पावलातून गावागावात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा’ हा संदेश पोहोचला पाहिजे,” असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.
शासनाने १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न करता गावागावातील नाले, तलाव आणि पाझर तलावांची स्वच्छता तसेच पाणी अडविणे व जिरविण्याची कामे लोकसहभागातून हाती घेतली पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे अभियान प्रत्यक्ष कामातून प्रभावीपणे राबवावे, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांचीही जबाबदारी
पाणी वाचविणे हा केवळ शेतकरी अथवा ग्रामीण भागाचा विषय नसून शहरातील प्रत्येक नागरिकाचीही तितकीच जबाबदारी आहे. विशेषतः तरुणांनी पाणी जपण्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी. “आजची वॉकेथॉन काही किलोमीटरवर संपेल; मात्र पाणी वाचवायचे आणि पुढील पिढीसाठी जपायचे हा विचार इथेच थांबता कामा नये. तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे,” असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
जलसंधारण अभियान १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन
‘वॉक फॉर वॉटर’मधून निर्माण झालेली जनजागृती गावागावातील प्रत्यक्ष जलसंधारणाच्या कामात रूपांतरित झाली पाहिजे. ‘पाणी अडवायचे, पाणी जिरवायचे, पाणी वाचवायचे आणि जळगाव जिल्हा जलसमृद्ध करायचा’ हा संकल्प प्रत्येकाने करावा आणि जलसंधारण अभियान १०० टक्के यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जलसंधारणाची शपथ
कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारण आणि पाणी बचतीची शपथ देण्यात आली. महा वॉकेथॉनच्या समारोपप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले, तर आभार जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश पारधी यांनी मानले.








